स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात होणार पंधराशे कोटींची कामे – छगन भुजबळ

छगन भुजबळ

स्वच्छ भारत मिशन २ अंर्तगत येणाऱ्या दोन तीन वर्षात जिल्ह्यात सुमारे १५०० कोटी रुपयांची कामे होणार असून सुमारे 261 कोटी रुपयांची लवकरच सुरू होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

भुजबळ फार्म येथे स्वच्छ भारत मिशन-२ अंतर्गत नाशिक जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात बाबत योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पी.सी.भांडेकर, शाखा अभियंता व्ही.व्ही. देसले, शाखा अभियंता येवला एम. एस.पाटील, शाखा अभियंता निफाड ए. बी.पाटील, सहायक अभियंता ए. के.घुगे , लासलगाव विंचुर सह १६ गाव समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर व समितीचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्वच्छ भारत मिशन २ अंतर्गत नाशिक जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच जलजीवन मिशन योजनेद्वारे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ६२ टक्के नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून ग्रामीण भागात सर्वांना नळाद्वारे पाणी उपलब्ध होईल यासाठी जलजीवन मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील छोट्या योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील १९० योजनांपैकी १२५ योजना मार्गी लागल्या असून इतर कामे सुरू आहेत. वाड्या वस्त्यांकरिता ५७२ योजना राबविण्यात येणार आहे. त्यापैकी २०० योजनांचे अंदाजपत्रके तयार झालेले आहेत. इतर योजनांच्या सर्वेची कामे सुरू आहेत. मार्च २०२२ पर्यंत १०० टक्के कामांना वर्क ऑर्डर देण्यात येऊन कामे मार्गी लागतील.येवल्यात जिल्हा परिषद अंतर्गत १५ नवीन योजना प्रस्तावित आहे. त्यातील ११ योजनांचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –