कोरोनाशी ज्या जिद्दीने, ईर्षेने आपण लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा – उद्धव ठाकरे

कोरोनाशी ज्या जिद्दीने, ईर्षेने आपण लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा - उद्धव ठाकरे कोरोना

मुंबई – कोरोनाशी आपण ज्या जिद्दीने लढलो आणि त्याचे चांगले परिणाम समोर आले. त्याच ईर्षेने स्वच्छ महाराष्ट्र घडविण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व सरपंचांना केले. असे काम आपण केल्यास स्वच्छतेच्या बाबतीत राज्य देशात अग्रेसर ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियान अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ‘सरपंच – पाणी व स्वच्छता संवाद’ उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वर्षा येथील समिती कक्षातून राज्यातील २७ हजार ८३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

या कार्यक्रमास नाशिक येथून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार श्रीमती सरोज अहिरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते तर वर्षा येथील समिती कक्षातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन तसेच जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद उपस्थित होते. यावेळी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान काही सरपंचांनी आपले  मनोगत मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केले.

स्वच्छता हेच अमृत‘ हा नवा मंत्र

आपण देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना स्वच्छता हेच अमृत हा नवा मंत्र आहे हे ध्यानात ठेवून काम करा. वैयक्तिक स्वच्छता असेल तर रोगराईला वाव मिळणार नाही. त्यामुळे आपले आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छतेच्या माध्यमातून हे अमृत आपण मिळवा असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

कोरोना परिस्थिती महाराष्ट्राने उत्तमरीत्या हाताळल्याबद्धल आपल्या सर्वांचे कौतुक करण्यात आले. आम्ही दिलेल्या सूचना आपण सगळ्यांनी पाळल्या त्याचेच हे फळ आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

कचरा मुक्त आणि निरोगी गावे निर्माण व्हावीत

कोरोनामुक्ती बरोबरच कचरा मुक्त आणि निरोगी गाव अशा मिशनने आपण पुढे गेले पाहिजे. संत गाडगेबाबांनी जो संदेश दिला आहे तो अजूनही कालबाह्य झालेला नाही. त्यांनी आपल्याला काळाच्या पुढे पाहायला शिकवले. ते तेव्हा एकटे होते पण आज आपण सगळे आहात. प्रत्येक सरपंच जर गाडगेबाबा बनले तर गावांचे चित्र बदलेल. अनेक साधू, संतांची परंपरा आपल्याला लाभली आहे. त्याच भूमीत आपण सुद्धा जन्माला आलो आहोत. आपल्याला ती शिकवण घेऊन पुढे जायचे आहे. लोकांकडून त्या शिकवणीप्रमाणे करून घ्यायचे आहे. भावी पिढीने सरपंचाची आठवण काढली पाहिजे इतके चांगले काम आपण करून दाखवावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केली.

विकासाची किरणे तळागाळापर्यंत पोहोचावी

‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना सरपंचांनी राबवून ती यशस्वी करणे गरजेचे आहे. विकासाची किरणे तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजेत. आपण सर्व या व्यवस्थेचा पाठकणा आहोत. तुमच्या सूचना, सहभाग हा या योजनेचे यश ठरविणार आहे. विश्वासाने लोक आपल्याला निवडून देतात. गावांत रोजगार निर्माण व्हावा, छोटे मोठे व्यवसाय सुरू व्हावेत, एक आदर्श गाव निर्माण व्हावे. सरपंच हे एखाद्या झाडाच्या मुळांसारखे असतात. म्हणून हे मूळ भक्कम असण्याची गरज आहे.

पर्यावरण जपून विकास व्हावा

पर्यावरण बदलते आहे असे आपण म्हणतो पण याला आपणच कारणीभूत आहोत. गावागावातली कामे करताना पर्यावरणाचा विचार करून झाली पाहिजेत. विकासाच्या ध्यासापायी पर्यावरणाची हानी व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाऊ नये अशी अपेक्षा  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

संकटे आली म्हणून डगमगून जाऊ नकाशासन सदैव आपल्या पाठीशी

आपण कोरोना सोबतच गेल्या दोन वर्षांपासून अनेक नैसर्गिक आपत्तींना समर्थपणे तोंड देत आहोत. परंतु आपण अजिबात डगमगू नका. यावर मात करण्याची ताकद आपल्यात आहे, खचून जाऊ नका. शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहे, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी आश्वस्त केले.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छता ही सेवा, गावे हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करणे, सत्याग्रह से स्वच्छाग्रह रथयात्रा, स्वच्छता संवाद, स्थायित्व व सुजलाम अभियान इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून  सायकल रॅली, शालेय स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून गावागावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची वाढवून निकड बघून राज्यात १३ लाख ६० हजार शोषखड्डे बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व सरपंचांच्या नेतृत्वातून व सक्रिय सहभागातूनच हे काम पूर्ण होऊ शकणार आहे.

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत २०२१-२२ या वर्षात २२ हजार १७३ गावांचे उद्दिष्ट ठेवले असले तरी १५ व्या वित्त आयोग अंतर्गत सर्व गावांमध्ये स्वच्छतेची कामे करावयाची आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यात या कामाचा समावेश करणे अनिवार्य आहे. चालू आर्थिक वर्षात २ लाख १९ हजार वैयक्‍तीक शौचालय पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गोबर धन अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जलजीवन मिशन हा उत्सवपुण्याचे काम

शासनाने हाती घेतलेले जलजीवन मिशन म्हणजे एक उत्सवाप्रमाणे आहे, एक यात्रा आहे. गावात पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या आंदोलनात, उत्सवात राज्यातील सर्व सरपंचांनी सहभागी व्हावे, पाण्याच्या कामाकरिता एकजुटता दाखवावी असे आवाहनही पाणी पुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी केले.

सुंदरनगर (गडचिरोली) व कान्हेवाडी (पुणे) गावाच्या सरपंचांनी साधला संवाद

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील सुंदरनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती जया मंडल तसेच पुणे जिल्ह्यातील चाकण तालुक्यातील कान्हेवाडी गावचे सरपंच भाऊसाहेब पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला. या दोन्ही सरपंचांनी आपल्या गावात सुरू असलेल्या श्रमदान, स्वच्छता विषयक उपक्रम, प्लास्टिक बंदी, पर्यावरण जपणूक विषयक केली जाणारी कामे याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे यांनी केले तर विभागाचे उपसचिव अभय महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.

महत्वाच्या बातम्या –