सोलापूर : शेतकरी फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात गुन्हा

टीम महाराष्ट्र देशा – शेतकरी आणि सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि जि.प. सदस्य रणजितसिंह शिंदेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.रात्री उशिरा माजी खासदार संदिपान थोरात, आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्यार भा.दं.वी. कलम 409, 420, 464, 465 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माढा येथील जगदंबा सूतगिरणीची मालमत्ता व मशिनरीची बेकायदा खरेदीविक्री व खादी ग्रामोद्योग मंडळाचे बोगस लाभार्थी दाखवून कर्जवाटप करून शेतकरी व सरकारची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या २०८ कोटी रूपयांच्या फसवणूक प्रकरणी माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.या तिघांवर माढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी माढा न्यायालयात केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

नेमकं काय आहे प्रकरण ?
२००६ ते २०१७ या दरम्यान यातील आरोपी संदीपान भगवान थोरात हे जगदंबा अनुसूचित जाती जमाती शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी माढाचे संस्थापक चेअरमन असताना पदाचा गैरवापर करून सूतगिरणीची मशिनरीची विनापरवाना विक्री केली. तसेच संदीपान थोरात व आमदार बबनराव शिंदे यांनी पदाचा गैरवापर करून सूत गिरणी माढा येथील ६ हेक्टर ६१ आर जमीन व इमारत ही मालमत्ता बेकायदेशीररित्या रणजितसिंह शिंदे यांना ३ कोटी रूपयांना विक्री केली.बबनराव शिंदे यांनी खादी ग्रामोद्योग महामंडळकडून जे शेतकरी व शेतमजूर नाहीत अशा लाभार्थींच्या नावे पाच कोटी रुपये उचलले व त्याचा अपहार केला. बबनराव शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे दोनशे कोटी रूपयांचे शेअर्स शेतकऱ्यांना विक्री करून शेअर्स सर्टिफिकेट व नफा दिलेला नाही.तसेच आमदार बबनराव शिंदे व रणजितसिंह शिंदे यांनी खाजगी साखर कारखान्याकरीता शेतकऱ्यांना दहा हजार ते सत्तर हजार रूपये प्रमाणे शेअर्स विक्री केली व शेअर्स सर्टिफिकेट व नफा दिलेला नाही व या रकमेचा अपहार केला. अशा प्रकारे या प्रकरणात संदीपान थोरात, बबनराव शिंदे व रणजितसिंह शिंदे यांनी 208 कोटी रूपयांचा अपहार करून शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.