प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांनी काढला पिक विमा!

शेतकरी

औरंगाबाद – प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील ५ लाख ४१ हजार ५०४ शेतकऱ्यांनी २ लाख ३१ हजार ७०५ हेक्‍टर खरीप पिकांचा विमा उतरविला आहे. या विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी तब्बल २३ कोटी ४५ लाख १३ हजार ६७० रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली आहे. मक्यावर २ वर्षांपासून लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. गेल्यावर्षी मका पिकाचे लष्करी अळीमुळे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानाचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सर्वाधिक मका पिकाचा विमा काढला आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. सध्या संपूर्ण मराठवाड्यात कोरडे हवामान असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाअभावी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत सहा लाख ४८ हजार १३३ हेक्‍टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यापैकी कपाशी ३ लाख ५६ हजार ६६४ हेक्‍टर, मका १ लाख ६९ हजार ६७२ हेक्‍टरवर, सोयाबीन २७ हजार ३३ हेक्टर, तूर ४१ हजार ६४३ हेक्टरसह उडीद, मूग, भुईमूग, तीळ, सूर्यफूल आदी पिकांचा समावेश देखील यात आहे.

दरम्यान शेतकर्‍यांच्या पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येते. या पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या पिकांचा विमा उतरवण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण ५ लाख ४१ हजार ५०४ शेतकऱ्यांनी आपल्या २ लाख ३१ हजार ७०५ हेक्टर पिकांचा विमा उतरवला आहे. यामध्ये कपाशी, मूग, बाजरी, मका, सोयाबीन, उडीद, कांदा, ज्वारी आदी पिकांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –