कोकणचा ‘राजा’ मोहरायला लागला

टीम महाराष्ट्र देशा :  गेला आठवडाभर पडणाऱ्या गुलाबी थंडीत कोकणवासीय गारठायला लागले असताना या उबदार दुलईत आता ‘कोकणचा राजा’ मोहरायला लागला आहे. ‘ओखी’चे संकट टळल्यानंतर वातावरणात आवश्यकतेपेक्षा कामालीचा गारवा जाणवायला लागल्याने आंबा चांगलाच मोहरू लागला आहे.

गेले तीन दिवस वातावरणात अनुकूल बदल झाले असुन पारा १८ ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरू लागल्याने रत्नागिरीतील बागायतदारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. आता बागायतदारांनी आंब्याला अनुकूल ठरणाऱ्या मोसमात कोकणच्या राजाच्या बेगमीवर लक्ष केंद्रित केले आहे.

‘ओखी’ शमल्यानंतर आता या आठवड्यात वातावरणात गारठा वाटू लागला आहे. वातावरण आंब्याला पोषक ठरू लागण्याचे संकेत बागायतदारांनी वर्तविले आहेत. ‘ओखी’ मध्ये झालेल्या पावसानंतर हा बदल झाल्याने बागायतदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.