‘या’ जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी

कोरोना

पुणे – गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम आता दिसू लागला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात नव्याने ४ हजार ५३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख ८७ हजार ०३० इतकी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ६ ते ७ हजारांच्या घरात असलेला आकडा पाच हजारांच्या आत आल्याने हा काहीसा दिलासा असून अशीच रुग्णसंख्या घटत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एक खास ट्विट केलं आहे. ‘सलाम पुणेकर : सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त संख्या अधिक ! पुणे मनपा हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज नवे ४,५३९ तर कोरोनामुक्त ४,८५१ नोंदवले गेले.’ अशी माहिती महापौरांनी दिली आहे.

यासोबतच, आज शहरातील ४ हजार ८५१ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख २९ हजार १४८ झाली आहे. तर, पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ३३० इतकी झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.