शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी मोफत सामायिक सुविधा केंद्र

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस आणि सूर्यफूल या पिकाचा विमा शेतकऱ्यांना भरता येईल. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरला कुठलेही शुल्क देण्याची गरज नाही. विमा हप्त्याव्यतिरिक्त शुल्क मागितल्यास संबंधित सीएससी चालकांची तक्रार पोलिस स्टेशन, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचा नियंत्रण कक्ष- दूरध्वनी क्र.०२४५२२२६४०० या क्रमांकावर करावी.

शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचे अर्ज, विमा हप्ता सामायिक सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन पध्दतीने भरता येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१९-२० अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी सामायिक सुविधा केंद्र(सीएससी)मार्फत मोफत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील. शेतकऱ्यांनी २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केले.

विमा भरण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, सातबारा उतारा, अधिसूचित पिकाची पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र, बँक पासबुकची प्रत, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांना करारनामा किंवा सहमती पत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

पीकनिहाय प्रति हेक्टरी हप्ता (रुपये) 

भात ८७०, ज्वारी ४९०, बाजरी ४००, सोयाबीन ८६०, सूर्यफूल ४६२, मूग ३८०, उडीद ३८०, तूर ६३०, कापूस २१५०  रुपये याप्रमाणे असेल.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील १९ लाख शेतकरी झाले उन्नत व समृद्ध…

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम