‘आमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको’

जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावरून आफ्रिका खंडामधील मलावी या देशामध्ये वाद सुरु झाला आहे. देशाची राजधानी असणाऱ्या ब्लांटायर शहरामध्ये महात्मा गांधींचा पुतळा बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला आहे.

गांधीजी वर्णद्वेषीही होते. आफ्रिकन आणि भारतीय लोकांना कामाच्या ठिकाणी एकाच प्रवेशद्वारामधून प्रवेश मिळावा याला गांधीजींनी विरोध केला होता,” असं या गटाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच त्यांनी यासाठी लढा देऊन भारतीय व आफ्रिकन कामगारांसाठी वेगवेगळे प्रवेशद्वार असावे ही मागणी मान्य करून घेतली होती असा दावाही या गटाने केला आहे.

यासंदर्भात जवळजवळ तीन हजारहून अधिक नागरिकांनी एका याचिकेवर स्वाक्षरी करून या पुतळ्याला विरोध दर्शवला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या महात्मा गांधींनी आपल्या देशासाठी काहीही केले नसल्याने त्यांच्या पुतळा आपल्या राजधानीत नको अशी भूमिका या नागरिकांनी घेतली आहे.

ब्लांटायर शहरामधील एका रस्त्याचे नामकरण महात्मा गांधींच्या नावे करण्यात आले आहे. त्याबरोबरच मागील दोन महिन्यांपासून गांधींजींचा पुतळा बनवण्याचे कामही सुरु होते. मलावी सरकारने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार एका करारानुसार महात्मा गांधींचा हा पुतळा उभारण्याची योजना आहे.

या करारानुसार भारत सरकार एक कोटी डॉलरची गुंतवणूक करून शहरामध्ये एक सांस्कृतिक केंद्र उभारणार आहे.सरकारच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी स्थानिकांनी ‘गांधी मस्ट फॉल’ गट तयार केला आहे. त्यांनी सोशल मिडियावर #GandhiMustFall हा हॅशटॅग वापरून आपला विरोध दर्शवला आहे.