ग्रामीण भागात  शंभर टक्के लसीकरण करा – नितीन राऊत

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य इशारा पाहता ग्रामीण भागातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याबरोबच  आरोग्य यंत्रणा बळकट व सुसज्ज करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले.

आज ग्रामीण भागात कामठी, मौदा, कुही व उमरेड येथील ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरला  त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार सर्वश्री ॲड. अभिजीत वंजारी, टेकचंद सावरकर,  राजू पारवे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिपक सेलोकार उपस्थित होते.

कोविडची दुसरी लाट ओसरत असली तरी गाफील राहून चालणार नाही असे सांगून  पालकमंत्री म्हणाले, लसीकरणानेच कोरोनावर मात करता येईल. लसीकरणाविषयीचे अनेक गैरसमज असल्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणाचा टक्का कमी आहे तो वाढविण्यासाठी  व्यापक प्रयत्नांची गरज आहे. ग्रामीण भागात सरपंच व लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन कोरोना तसेच म्युकरमायकोसिस या आजाराबाबत प्रभावी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री म्हणाले. ग्रामीण भागातील शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी तारसा येथील प्राथमिक आरोग्य  केंद्रातील कोविड सेंटरला भेट दिली. तेथील रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. येथील लसीकरण प्रगतीपथावर असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  यानंतर मौदा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन कोविड सेटरची पाहणी केली.  वैद्यकीय अधिकारी डॉ. यु. के.  पाटील   यांच्याशी संवाद साधून कोरोना रुग्ण व लसीकरणाची माहिती घेतली .लसीकरण करतांना नागरिकांच्या मनात असलेले प्रश्न किंवा भीती कमी करण्यासाठी त्यांच्याशी सुसंवाद करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

कुही येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. तद्नंतर उमरेड येथील ग्रामीण रुग्णालय व लसीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी  वर्ग-2 अधिकाऱ्यांनी एक एक गावाचे पालकत्व स्वीकारले आहे व कोरोना व लसीकरणाबाबत  गावकऱ्यांत असलेल्या भीतीबाबत जनजागृती करुन मागर्दशन करीत आहेत. तसेच प्रशासनाने दिलेल्या चित्रफिती ग्रामपंचायतीमध्ये दाखवून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. आमदार राजू पारवे यांनी तालुक्यात 94 टक्के लसीकरण झाले असल्याचे सांगितले. पावसाळा जवळ येत आहे,  शेतकऱ्यांच्या हंगामास सुरुवात होण्याच्या अगोदर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

म्युकरमायकोसिसच्या जनजागृतीसाठी वरिष्ठ अधिकारी  गावागावात  जात आहेत. या अधिकाऱ्यांच्या  कामाची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी घेतली. माझे कार्यक्षेत्र-माझी जबाबदारी या संकल्पनेनुसार अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी ग्रामीण भागातील जनतेला केले. आरोग्य यंत्रणेच्या पाहणीसोबत त्यांना संवादातून प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य सुसज्जता तपासण्यावर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा भर आहे.

महत्वाच्या बातम्या –