केंद्राकडून पशुसंवर्धनासाठी सहकार्य मिळावे – सुनील केदार

सुनील केदार

नवी दिल्ली –  जनावरांचा विम्याचा निधी, राष्ट्रीय पशुधन मिशनअंतर्गत राज्याकडून येणाऱ्‍या प्रस्तावास मंजुरी आणि परदेशी संकरित गायी आणि बकऱ्यांच्या आयातीबाबत परवानगी मिळावी यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला आणि महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्यात पार पाडली.

श्री. सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केंद्रीय मंत्री श्री. रूपाला यांची कृषी भवन येथे भेट घेतली. बैठकीत राज्याशी निगडीत पशुसंवर्धन विषयावर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील जनावरांच्या विमासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आलेला आहे. केंद्राकडून या प्रस्तावास मंजुरी मिळावी तसेच याबाबतचा निधी शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून मिळावा, अशी मागणी श्री.केदार यांनी यावेळी केली.

यासह राष्ट्र पशुधन मिशनमध्ये विविध जाती विकसित करण्याबाबत प्रस्तावास मंजुरी तसेच या मिशनअंतर्गंत मिळणारा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणीही केली. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पशुच्या विविध जातीचे संकर विकसित करण्यास गती येईल, असेही श्री.केदार यांनी सांगितले.

भारतीय गीर जातीच्या गायींवर ब्राझीलमध्ये संशोधन होऊन अध‍िक दुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकर‍ित गीर गाय दिवसाला 25-27 लीटर दूध देते. या गीर जातीच्या गायी भारतात आणून शेतकऱ्यांना द्याव्यात जेणे करून शेतकऱ्यांचा जोडधंद्याला भरभराट येईल. तसेच यासोबतच सानेन या जातीच्या बकऱ्‍या ज्या दिवसाला 10-12 लीटर दूध देतात. या बकऱ्‍या महाराष्ट्रात आणण्याची परवानगी मिळावी, जेणे करून  बकऱ्‍यांच्या दुधातून रोजगार वाढीसाठी मदत होईल, अशी मागणीही श्री केदार यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली. या बकरीचे संकर नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनेडा, इजराइल येथे मोठ्या प्रमाणात आहेत पशुंच्या आयातीसंदर्भात परराष्ट्रीय व्यवहार मंत्रालयाकडून काही परवानग्यांची आवश्यकता असते, त्या मिळण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाकडून सहकार्य मिळावे, अशी मागणी  श्री केदार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली.

महत्वाच्या बातम्या –