सर्व्हेक्षणासाठी घरी येणाऱ्या पथकाला अचूक माहिती द्या – विभागीय आयुक्त सिंह

यवतमाळ – गत सहा महिन्यांपासून शासन आणि प्रशासन कोरोनविरुध्दची लढाई अविरत लढत आहे. कोरोनाचा प्रकोप मात्र कमी होण्यापेक्षा वाढतीवरच आहे. सप्टेंबर महिन्यात तर बाधितांच्या आणि मृत्युच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढत झाली आहे. त्यामुळेच शासनाने प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणा-या पथकाला अचूक माहिती दिली तरच आपण कोरोनामुळे होणारे नुकसान टाळू शकतो, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले.

बाभुळगाव तालुक्यातील मालापूर येथे ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. समाज मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. तरंगतुषार वारे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, डॉ. पी.एस.चव्हाण, मालापूरच्या सरपंचा शांताबाई हुकरे आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत लॉकडाऊन राहिले नाही, असे सांगून विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, बहुतांश नागरिक बेजबाबदारपणे वागत आहे. मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, हात वारंवार स्वच्छ न धुणे या नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनचा प्रादुर्भाव लक्षणीय वाढला आहे. मृत्युसाठी तर वयाचे बंधनसुध्दा राहिले नाही. आपण जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून किमान स्वत:साठी व आपल्या कुटुंबासाठी कोणतीही माहिती लपवू नका. घरात को-मॉरबीड नागरिक असेल किंवा एखाद्याला आयएलआय, सारी आणि कोरोनासदृश्य लक्षणे असलीत तर त्याची माहिती पथकाला द्या. जेणेकरून मृत्युदर कमी करण्यात यश येईल. आपण माहिती लपविली तर आपल्याच कुटुंबाचे नुकसान होणार आहे, याची जाणीव ठेवा. ही मोहीम यशस्वी करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे मोहिमेच्या यशस्वीतेकरीता प्रत्येकाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले, ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम कोरोनाबाधितांची संख्या तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी आहे. स्वत:च्या चुकीमुळे मृत्युला आमंत्रण देऊ नका. यावरील लस कधी येणार हे अजूनही निश्चित नाही. त्यामुळे वारंवार हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर करणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे, हीच सध्या मुख्य औषध आहे. सर्व्हेक्षण करतांना आयएलआय, सारी, को-मॉरबीड नागरिकांचा डाटा व्यवस्थित भरा. बाभुळगाव तालुक्यात संपूर्ण टीमने चांगले काम केल्यामुळेच येथे मृत्युदर कमी आहे. यापुढेही असेच काम करा व स्वत:ची काळजी घ्या, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, कोरोनासोबत जगण्याची आपल्याला सवय करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मृत्युदर कमी करणे व संक्रमणाची साखळी तोडणे या दोन बाबींवर शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्यासाठी लोकांनी स्वत:हून समोर येणे गरजेचे आहे. 106 वर्षाची म्हातारीसुध्दा कोरोनातून बरी झाली आहे. त्यामुळे सर्वांनी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य यंत्रणेने सदाशिवराव राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबातील नागरिकांची पल्स ऑक्सीमीटर व गनच्या सहाय्याने आरोग्य तपासणी केली. तत्पूर्वी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जनजागृती साहित्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केले. संचालन राजेंद्र दोनोड यांनी तर आभार गटविकास अधिकारी रमेश दोडके यांनी मानले. कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुषमा खोडवे, तसेच तालुकास्तरावरील इतर अधिकारी, अंगणवाडी सेविका व नागरीक उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –