केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे – दिलीप वळसे पाटील

पुणे – पाकिस्तानची साखर जर भारतात आली तर देशातील साखरेवर आणि शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होईल. निर्यात आणि आयात शुल्काबाबत सरकारने योग्य धोरण ठेवले पाहिजे. पाकिस्तान सरकार ज्या पद्धतीने तिथल्या साखरेला अनुदान देते, त्या पद्धतीने केंद्र सरकारने आपल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे, असे मत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

येत्या २६ डिसेंबरला मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्सिट्युटची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्वसाधारण सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी कृषीमंत्री शरद पवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत.

यावेळी ऊस पुरस्कारही दिले जाणार आहेत. वसंतदादा शुगर इन्सिट्युटच्यावतीने उसाचे नवीन वाण तयार करण्यात आले असून २०१६ मध्ये वीएसआय ०८००५ हा वाण विकसित केला गेला आहे. तो चौदा महिन्यांपर्यंत टिकू शकतो. या वाणामुळे एकरी ५० टन उत्पन्न मिळू शकते. पाणी कमी पडले तरी दर्जा तोच राहणार आहे. तसेच याला किड लागणार नसून डुकरांपासूनही याचे नुकसान होणार नाही. याचे वाटप सुरू झाले असून राज्यात वीस हेक्टर क्षेत्रावर या वाणाचे पीक घेण्यात आले अशी माहिती कृषी व्यवस्थापक एस. एस. कटके यांनी दिली.