शेतात उतरून काम करा! शेतकऱ्याचे चॅलेंज स्वीकारत गोव्याचे मंत्री पोहचले भात लावणीला

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सोशल मिडीयावर देशभरात ‘फिटनेस’ चॅलेंजचा बोलबाला सुरु आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फिटनेस चॅलेंज स्वीकारत व्यायामाचे महत्व सांगितले होते. आता, याच गोष्टीचा धागा पकडत गोव्यातील आके-बायशचे सरपंच आणि शेतकरी असणारे सिद्धेश भगत यांनी शेतात उतरून काम करण्याचे आव्हान आमदार- मंत्र्यांना दिले होते. त्यानंतर मोठ्या उत्साहाने फिटनेस चॅलेंज स्वीकारणारे नेते शेती चॅलेंज स्वीकारणार का ? असा प्रश्न निर्माण झाला.

दरम्यान, शेतकर्‍यांच्या समस्या समजून घेण्यासाठी शेतात उतरून काम करून दाखवा म्हणत सिद्धेश भगत दिलेले आव्हान स्वीकारत शेती बहुल कुडतरीचे मतदार संघाचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांनी शेतकऱ्यासोबत एक दिवस काम केलं, लॉरेन्सो यांच्यानंतर महसूल मंत्री रोहन खंवटे आणि कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी देखील शेतामध्ये भात लावणीचे काम केलं आहे.

हम फिट तो इंडिया फिट म्हणत क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी सुरु केलेल्या फिटनेस चॅलेंजला देशभरातील अनेक नेते, क्रिकेटर, सेलिब्रेटींनी प्रतिसाद दिला होता. आता शेतकर्‍यांच्या समस्या समजण्यासाठी सुरु झालेल्या अभियानाला गोव्यामध्ये उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अशाच प्रकारचे आव्हान महाराष्ट्रातील नेते देखील स्वीकारणार का ? असा प्रश्न सोशल मिडीयावर विचारला जात आहे.