जिल्ह्यासाठी चांगली बातमी : मार्च महिन्यानंतर प्रथमच नव्या कोरोनाबाधितांची संख्या तीन अंकी

ओमायक्रॉन

पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. मात्र, आता शहरातील कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कोरोनामुक्तांचा आकडा हा नव्या रुग्णांपेक्षा अधिक असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होत असतानाच पुणेकरांसाठी आज अत्यंत दिलासादायक अशी आकडेवारी समोर आली आहे.

मार्च महिन्यानंतर प्रथमच नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही तीन अंकी आकड्यांवर आली आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. ‘नव्या कोरोना रुग्णसंख्येत दिलासा मिळत असताना आज त्यात आणखी भर पडली. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून आज नोंदवली गेलेली रुग्णसंख्या सर्वात कमी आहे,’ असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

पुणे शहरात आज नव्याने ६८४ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, २ हजार ७९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस हे महत्वाचे असून पुणेकरांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –