जिल्ह्यासाठी चांगली बातमी – गेल्या २४ तासांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही

नांदेड – दीड वर्षापासून कोरोनाच्या मगरमिठीत अडकलेल्या नांदेडकरांनी मंगळवारी मोकळा श्वास घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने घेतलेले कठोर परिश्रम, नागरिकांनी त्याला मनापासून दिलेला प्रतिसाद यामुळेच गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नाही आणि कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नांदेड निरंक असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नांदेड शहरासोबत ग्रामीण भागातही दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत होती. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले होते. जिल्ह्यातही रोज दीड हजारावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. तर, मृत्यूही २५ च्या वर होत होते. ११ एप्रिल रोजी सर्वाधिक १९१० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. रुग्णांना बेडसोबत अंत्यविधीसाठीही वेटिंगची विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागली.

मंगळवारी एक हजार ४९२ अहवालांपैकी एक हजार ४७६ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले असून एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. कोरोनाबाधितांची संख्या ९१ हजार २३१ वर पोहोचली आहे. तसेच एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे बाधित मृत रुग्णांची संख्या एक हजार ९०४ इतकी झाली आहे. तर, आतापर्यंत ८८ हजार ५९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज १३८ रुग्ण उपचार घेत असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक संतोष शिरसीकर यांनी सांगितले.

मराठवाड्यातील आकडेवारी
बीड जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्या अजूनही नियंत्रणात आलेली नाही. येथे दिवसभरात १७० रुग्ण आढळले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात २९ नवे रुग्ण सापडले असून, दोन जणांचा मृत्यू झाला. तर परभणी जिल्ह्यात २५ रुग्ण सापडले आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात ५३, हिंगोली जिल्ह्यात ५ तर जालना जिल्ह्यात ११ नवे रुग्ण आढळले. जालन्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद, हिंगोलीत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ४० नवे रुग्ण आढळले तर दोन जणांचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या –