खुशखबर! ‘या’ तारखेपासून राज्यातील शाळा होणार सुरु

खुशखबर! 'या' तारखेपासून राज्यातील शाळा होणार सुरु

मुंबई –  गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात  कोरोना रोगाने थैमान घातला आहे. तर अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. त्यातच कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.

एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यावर याची अंमलबजावणी होईल. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक आहे. त्यात यावर चर्चा होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आले आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.

दरम्यान, राज्यात शाळा सुरू करण्याची घाई नको, त्यासाठी अजून काही काळ थांबावं लागेल, असे आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. परदेशात आणखी नवीन स्ट्रेन सापडले आहेत, त्यातच महाराष्ट्रात कोविडच्या केसेस अधिक आहेत. दुसरीकडे लहान मुलांवर लसीकरण ट्रायल सुरू आहे. त्यामुळे, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल, असे पवार यांनी सांगितले.