खुशखबर! लवकरच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मोठी मदत

अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील ३४ हजार हेक्‍टर क्षेत्र नाहीसे  झाले आहे. तब्बल ४९ हजार २५६ शेतकऱ्यांचे यात मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना   मोठा दिलासा मिळणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीपासून शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागला त्यात शेतकरी मोठ्या संकटात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शेती व्यवस्थापनात देखील अनेकदा व्यत्यय आला. या संकटांवर मात करीत शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. मात्र, निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. पेरणी साधली असतानाच जून ते ऑगस्ट या कालावधीत पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले. त्यामुळे दारव्हा आणि नेर या तालुक्यातील शेत पिके खरडून गेली.

जिल्ह्याच्या इतर तालुक्यात देखील पिकांना फटका बसला असल्याचं दिसत आहे. या संकटातून शेतकरी बाहेर येत नाहीत आणि पिके जोमात असताना ऐन काढणीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपून काढले. संततधारेमुळे सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटले. कापसाची बोंडे सडली. कापूस, सोयाबीन, सोबतच तूर, उडीद, मूग या शेतीपिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने जून ते ऑगस्ट या कालावधीत नुकसानग्रस्त शेतपीकांची पाहणी केली होती. त्यात बाधित क्षेत्र २ हजार ९२६ हेक्‍टर एवढे आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील शेत पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याचं दिसत आहे. त्यामध्ये ३४ हजार हेक्‍टर खरिपाचे क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. अतिवृष्टीचा जिल्ह्यातील ४९ हजार शेतकऱ्यांना फटका बसला.

दरम्यान, या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी २४ कोटी २७ लाख ४३ हजार रुपयांच्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. शासनाने दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असे सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –