गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : प्रलंबित प्रस्तावांच्या निपटाऱ्यासाठी कालबद्ध मोहीम राबवा

मुंबई – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव दाखल करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी आणि शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विमा कंपन्यांना दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत शेतकरी अपघात विमा योजनेचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्तालयातील अधिकारी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणनिहाय आढावा घ्यावा. त्याची फेरतपासणी करावी, कागदपत्रांची पूर्तता करुन ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबाला दिलासा द्यावा, असेही श्री. भुसे यांनी सांगितले. यावेळी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या वर्षातील प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली. या योजनेत ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यासाठीदेखील विभागाने कार्यवाही करावी. तातडीने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.

जिल्ह्यांमध्ये झालेल्या अपघातांबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती कळविण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना कृषी विभागाच्या सचिवांमार्फत पत्र देण्यात यावे. जेणेकरुन या माहितीमुळे विभागाकडे शेतकरी अपघातांविषयी वेळीच माहिती मिळणे शक्य होईल, असेही श्री.भुसे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –