गोरक्षकांचे काम सुयोग्य प्रक्रियेद्वारे सुरु ठेवण्याचा निर्धार

पुणे : गोरक्षकांचे काम हे खब-यांसारखे असते. ते माहिती गोळा करून पोलिसांकडे देत असतील, तर त्याला कोणत्याही न्यायालयाने प्रतिबंध केलेला नाही. कायदा हातात न घेता गुन्हे थांबविण्याचे काम सध्या गोरक्षकांकडून सुरु आहे. त्यामुळे सुयोग्य प्रक्रियेद्वारे गोरक्षकांचे काम यापुढेही चालूच राहिल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांबाबत अनेकांमध्ये समज-गैरसमज असून त्याचा खरा अर्थ गोरक्षक व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती अखिल भारत कृषि गोसेवा संघ, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी भारतीय पशु कल्याण मंडळाचे पशु कल्याण अधिकारी मनोज ओसवाल उपस्थित होते.

माननीय मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयानेही दिलेल्या आदेशांच्या मालिकेत, गोरक्षक हे जोपर्यंत कायदा हाती घेत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या कृतीला स्थगिती द्यायला नकार देण्यात आला आहे. त्याकाळात दिलेला आदेश आता उपलब्ध झालेला आहे. मिलिंद एकबोटे म्हणाले, गेल्या काही काळात महाराष्ट्रात गोरक्षकांकडून एकही हिंसक कृती झालेली नाही. सुमारे २५० हून अधिक गायी आणि त्यांचा वंश हा नियमीत प्रक्रियेनुसारच, बकरी ईदच्या काळात वाचवण्यात आल्या . महाराष्ट्रातील गोरक्षक हे गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही हिंसक कृतीशिवाय, नियमीतपणे गुराढोरांच्या तस्करांविरोधात एफआयआर दाखल करत आहेत. यापुढेही गोरक्षक हे सुयोग्य प्रक्रियेद्वारे त्यांचे कार्य पुढे चालू ठेवतील आणि देशाला मदत करुन, कृषि पशूंची राष्ट्रीय संपत्ती जतन करतील.

पोलीस विभागाने यासंदर्भात एक प्रतिज्ञापत्र दिले असून, ज्यात असे नमूद केले आहे की, प्रिव्हेन्शन आॅफ क्रुएल्टी टू एनिमल्स एक्ट किंवा एनिमल प्रिजर्वेशन एक्टमधील तरतुदींचे उल्लंघन होत असेल तर त्याची दखल घेण्यासाठी पोलिसांवर कोणतेही प्रतिबंध नाहीत. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम १३ प्रमाणे सद्हेतूने प्राणीरक्षणाचे काम करणा-यांवर कारवाई होऊ शकत नाही, असे कायदेशीर संरक्षण गोरक्षकांना देण्यात आले आहे. त्यामुळे गोरक्षकांचे काम यापुढेही सातत्याने सुरु राहणार आहे.