शासकीय कापूस खरेदी केंद्रे ताबडतोब सुरू करा; बाजार समिती सभापतींची मागणी

औरंगाबाद-तालुक्यात तात्काळ शासकीय कापूस व भरड धान्य खरेदी केंद्र सुरु करुन शेतक-यांची व्यापायांकडून होणारी लुट त्वरीत थांबवावी, अशी मागणी फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे यांनी केली आहे. याविषयी बोरसे यांनी तहसीलदार संगीता चव्हाण यांना निवेदन दिले.कापूस व मका खरेदी हंगाम २०१७-१८ सुरु झालेला आहे. फुलंब्री तालुक्यात बर्यापैकी कापूस व मका पिकाचे उत्पादन झालेले आहे. काही दिवसातच या पिकांची बाजारपेठेत आवक वाढणार आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे. शासकीय भरड धान्य केंद्र सुरु झाल्यास शेतकर्यांच्या पदरात शासनाच्या हमी भावाची रक्कम पडेल अन्यथा अशीच स्थिती राहिल्यास व्यापा-यांकडून शेतक-यांची लूट होण्याची शक्यता आहे. याकरीता शासकीय कापूस व भरड धान्य केंद्र सुरु करण्याबाबत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे सभापती बोरसे यांनी केली आहे.