१६०० छावण्यांना २०० कोटी देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली – धनंजय मुंडे

dhananjay-munde

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी, जाहीर आर्थिक मदतीचे वाटप याबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, सरकारने ३१ ऑक्टोबरला १२१ तालुके दुष्काळी म्हणून घोषित केले असताना, जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यासाठी एप्रिल महिना का उजाडला? राज्यभरातील १६०० छावण्यांना अवघे २०० कोटी देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. जनावरांना टॅगिंगसारखे जाचक नियम लादून शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय. असा आरोप धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर केला.

इतकेच नव्हे तर, राज्यात दुष्काळी स्थिती गंभीर आहे. ग्रामीणच नाही तर शहरी भागातही तीव्र पाणीटंचाईस लोकांना सामोरे जावे लागत असताना सर्व कामकाज बाजूला ठेऊन दुष्काळ निवारण्याच्या उपाययोजनांसाठीच्या चर्चेचा स्थगन प्रस्ताव फेटाळावा हे दुर्दैवी आहे. सरकार जनतेच्या प्रश्नांवर गंभीर नाही हे स्पष्ट आहे, अशी टीकाही मुंडे यांनी केली.

तसेच दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी, जाहीर आर्थिक मदतीचे वाटप याबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आतातरी शेतकऱ्यांना बियाणे व पूर्वमशागतीच्या तयारीसाठी हेक्टरी २५ हजार, वादळ-गारपिटीने नुकसान झालेल्या फळबागांना हेक्टरी १ लाख आणि अन्य पिकांसाठी हेक्टरी ५० हजाराची मदत जाहीर करावी, अशी मागणीही मुंडे यांनी यावेळी केली.