आता मिळणार शेतीचा ‘ऑनलाईन’ सातबारा

वेबटीम- सातबारा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता असणार नाही. ऑनलाईन किंवा महा ई सेवा केंद्रातून डिजीटल सहीचा वैध कायदेशीर सात – बारा मिळेल. कारण भूमिअभिलेख विभाग येत्या एक मेपासून राज्यातील 40 हजार गावांमध्ये सातबारे उतारे डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देणार आहे.

हे सातबारे उतारे न्यायालयीन कामकाज अन्य ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. हा डिजिटल सातबारा सध्या पूर्णत: निशुल्क असणार आहे. महा ई सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टलवरून  ( https://aaplesarkar.mahaonline.gov.in ) हा सातबारा मिळणार आहे. सातबारा उतारा मिळण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

काही जिल्ह्यात ऑनलाईन सातबारा दिला जात नव्हता. दफ्तरातील सातबारा आणि संगणकावरील सातबारा यामध्ये थोडी तफावत असल्याने ऑनलाईन सात-बारा दिला जात नव्हता. त्यामुळेच ऑनलाईन सात-बारा उपलब्ध करुन देण्यात आलेला नव्हता. ही त्रुटी दूर करण्यासाठीच एडिट मोडूल म्हणजेच सात-बारा दुरुस्तीचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले होते.