शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी सरकार तयार; गिरीश महाजन घेणार शेतकऱ्यांची भेट

मुंबई: विविध मागण्यांसाठी अनवाणी पायाने चालणाऱ्या शेतकऱ्याचा लॉंग मार्च ठाण्यात येऊन धडकला. शेतकऱ्यांना शिवसेना, मनसे आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे राज्यसरकार नरमले असून गिरीश महाजन शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.

किसान मोर्चासोबत चर्चेसाठी आता सरकारनं सकारात्मक हालचाली सुरु केल्या आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन विक्रोळीमध्ये मोर्चेकऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे गिरीश महाजन सरकारच्या वतीनं मोर्चेकऱ्यांना काय आश्वासनं देतात, हे पाहणं महत्वाचं आहे. सोमवारी हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. कॉम्रेड नेते अजित नवले, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे आणि शेकाप आमदार जयंत पाटील या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

  1. कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात
  2. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, बोंडअळी व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न
  3. शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या
  4. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या
  5. वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा
  6. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा
  7. स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा