सरकारकडून शेतकऱ्यांची पुन्हा थट्टा ; गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे केले सुलतानी पंचनामे

टीम महाराष्ट्र देशा: गारपीटग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीसाठी आस लाऊन बसला आहे. आधी अस्मानी संकटाने शेतकऱ्याला झोडपले आणि आता सरकार नावाच्या सुलतानी संकटाने शेतकऱ्याची थट्टा करण्याच काम सुरु केल आहे. गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणचे पंचनामे बाकी असल्यामुळे ते कधी होणार याची आतुरतेने शेतकरी वाट पाहत आहेत.

तर दुस-या बाजूला ज्या शेतक-यांच्या शेतात पंचनामे केले जात आहेत. त्या शेतक-यांना प्रशासनाकडून गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात आहे. ज्या शेतक-यांच्या शेतात पंचनामा केला जात आहे, त्या शेतक-यांना त्या पिकात उभा करुन त्यांच्या हातात गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्या नावाची पाटी देवून त्यांचा फोटो काढला जात आहे. त्यामुळे हे शेतकरी आहेत की गुन्हेगार असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्वीट करुन प्रशासनाने काढलेले शेतक-यांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच या ट्वीटमध्ये त्यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात त्याप्रमाणे शेतक-यांच्या हातात नावाच्या पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल आता चव्हाणांना केला आहे.