अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

राज्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

धुळे जिल्ह्याची आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील 1200 गावांचा ‘पेसा’मध्ये समावेश करण्यासाठी राज्यशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आठ दिवसात केंद्र शासनास सादर करण्यात येईल. साक्री येथील मोडकळीस आलेल्या बसस्थानकाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात येतील. जलयुक्त शिवार अभियानाची जी कामे प्रगतीपथावर आहेत तसेच जी कामे सुरु झाली आहे ती पूर्ण करण्यात येतील. धुळे शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मालेगाव रोडवर उड्डाणपुलाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. निम्न पांझरा, अक्कलपाडा धरण पूर्ण भरण्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची अडचण लक्षात घेता हे धरण भरल्यानंतर त्याखालील धरण भरुन जलसाठा वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन कंपन्यांशी चर्चा सुरु असून हा प्रश्न तातडीने सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागास दिल्या. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनीही याबाबत बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचे व शिरपूर हे महामार्गावरील महत्वाचे शहर असल्याने येथील आरोग्य केंद्राचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत संबधितांना दिले.

यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासाठी जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत उद्योग येण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच धुळे शहरात 100 खाटांचे रुग्णालय मंजूर असून त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग तातडीने उपलब्ध करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एमआरआय मशीन खरेदीस तसेच रिक्त पदे भरणे याबाबत सूचना मांडल्या.

बैठकीच्या सुरुवातीस देवळा तालुक्यात एसटी बस व रिक्षा यांच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधीनी आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृह बांधकाम करणे, खरीप हंगाम 2018 ची नुकसान भरपाई मिळणे, पिंपळनेर तालुका निर्मिती अध्यादेश काढणे,  100 खाटांचे जिल्हा रुग्णालय तातडीने सुरु करणे, जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणे, जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालये मंजूर करण्याची मागणी करुन त्यांच्या मतदारसंघातील अडचणी व प्रश्न मांडले. त्यावर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी तातडीने संबंधित विभागाच्या सचिवांशी चर्चा करुन त्या सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीस कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, आमदार श्रीमती मंजुळा गावित, आमदार काशिराम पावरा, आमदार डॉ फारुक शाह, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव आय. एस. चहल, उर्जा सचिव असिमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. महापालिका आयुक्त शेख आदिंसह सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

मत्स्यपालन व शिंगाडा उत्पादन करुन शेतकऱ्यांचा प्रयोग ठरतोय प्रेरणादायी

फिरते पोटविकार केंद्र राज्यातील गरीब, गरजू रूग्णांना मोफत अद्ययावत सेवा देईल – मुख्यमंत्री

लातूरमध्ये जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतर्फे आज पाणी परिषदेचे आयोजन