निर्धोक हवामानामुळे देशातील द्राक्षांच्या निर्यातीची घोडदौड

पुणे  : गारपीट, अवकाळी पाऊस, धुके या नैसर्गिक संकटांमुळे गेल्या चार-पाच वर्षांत द्राक्षबागांपुढे संकट उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर यंदाचे निर्धोक हवामान द्राक्ष उत्पादनासाठी पोषक ठरले असून द्राक्ष निर्यातीच्या विक्रमी हंगामाकडे वाटचाल सुरू झाली आहे.गेल्या तीन वर्षांपासून द्राक्ष निर्यातीमध्ये वाढ होत आली आहे. रशिया, चीन या नव्या बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत.

बांगलादेशमार्गे चीन आणि ईशान्य आशियाई देशांमध्ये भारतीय द्राक्षे जात आहेत. २०१४-१५ वर्षात १ लाख ७ हजार टनांवर असणारी द्राक्ष निर्यात गेल्या वर्षी दुपटीपेक्षा अधिक वाढली. गेल्या वर्षीची २ लाख ३२ हजार टन निर्यात आजवरची सर्वाधिक द्राक्ष निर्यात आहे. यंदाचे वर्षदेखील याच दिशेने वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राज्य कृषी विभागाच्या निर्यात कक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशातून ३४ हजार ७५२ बागांची नोंदणी द्राक्ष निर्यातीसाठी झाली. यातल्या ३४ हजार ६१२ द्राक्षबागा फक्त महाराष्ट्रातल्याच आहेत. उर्वरित ७२ कर्नाटक व ६८ आंध्रातल्या आहेत. उत्कृष्ट हवामानामुळे द्राक्ष उत्पादनाचा दर्जा चांगला आहे. रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी झाल्याने खर्चातही बचत झाली आहे.

मार्च अखेरपर्यंत निर्यात चालू राहील.नाशिक विभागीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी सांगितले की, थंडी टिकून राहिल्यामुळे स्थानिक बाजारात सध्या उठाव कमी आहे. थंडीत द्राक्षे काहीशी आंबट राहतात. उन्हाचा कडाका वाढेल तशी द्राक्षाची गोडी वाढत जाते. युरोपीय बाजारातील आयातदारांनी नेहमीपेक्षा लवकर मागणी केल्याने निर्यात मात्र दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच सुरू झाली. दरम्यान, नाशिकच्या द्राक्षांना सोलापूर, सांगली पट्ट्यातील द्राक्षांची स्पर्धा असल्याचे ते म्हणाले. यंदा १४ ऑक्टोबरपूर्वीच्या पावसाने नाशिक पट्ट्यातल्या फुलोऱ्यात आलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले. त्याच वेळी उत्पादनात ३० टक्के घट झाली. त्यानंतर हवामानाची साथ मिळाल्याने द्राक्षांचा दर्जा उत्तम आहे.आतापर्यंत युरोपीय देशांमध्ये १३ हजार २४६ टनांची निर्यात झाली.

गेल्या वर्षी आजच्या तारखेला ही निर्यात ९ हजार ४६ टन होती. याशिवाय चीनमध्ये दोन हजार टन, रशियात चार हजार टन आणि इतर देशांमध्येही सुमारे सव्वाचार हजार टन द्राक्ष निर्यात यंदाच्या हंगामात झाली आहे. स्थानिक बाजारपेठेपेक्षा साधारणतः दुप्पट भाव निर्यातीच्या द्राक्षांना मिळत असल्याने निर्यातीकडे बागायतदारांचा कल असतो. अर्थात स्थानिक बाजारपेठ मोठी असल्याने एकूण द्राक्ष उत्पादनापैकी फक्त १० टक्के द्राक्षेच निर्यात होतात.द्राक्ष हे देशातले महत्त्वाचे नगदी फळपीक आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात देशातून २ लाख ३२ हजार ९४० टन द्राक्ष निर्यात झाली. यातून द्राक्ष उत्पादकांच्या खिशात २ हजार ८८ कोटी रुपये आले. देशाच्या एकूण द्राक्ष उत्पादनापैकी ८२ टक्के उत्पादन फक्त महाराष्ट्रात होते.

त्यातही देशातल्या एकूण निर्यातक्षम द्राक्षबागांपैकी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बागा एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत. नेदरलँड, इंग्लंड, रशिया, अरब अमिरात आणि जर्मनी हे देश भारतीय द्राक्षांचे प्रमुख ग्राहक आहेत.