जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर ‘या’ नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मांजरा नदी

उस्मानाबाद – राज्यातील मागील काही दिवसापासून चांगलाच पाऊस पडत आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यातून वाहणाऱ्या तेरणा आणि मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा धरण तसेच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणही लवकरच भरण्याची शक्यता आहे. या सर्वामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी मांजरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. तसेच आगामी काळातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आगामी काळात देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे धरणातील पाणी तेरणा नदीमार्गे तसेच मांजरा नदी मार्गे सोडावे लागणार आहे. यामुळे तेरणा नदीकाठी आणि मांजरा नदी काठी वस्ती करून राहणारे नागरिक गावकरी तसेच शेतकरी यांना सतर्कतेचा इशारा लातूरच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी दिला आहे.

गुरुवारी उशीरापर्यंत निम्न तेरणा प्रकल्पात ६०३ मिलिमीटर पाणी पातळी होती. धरणातील उपयुक्त पाणीसाठा एक्काहत्तर पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतका होता. तर मांजरा धरणात ६४१ पूर्णांक ५३ मिलिमीटर इतका पाणीसाठा असून ८० टक्के धरण भरलेले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत राहिल्यास धरण केव्हाही भरल्यास मांजरा नदीकाठची गावे तसेच तेरणा नदीकाठावरील गावात पाणी शिरण्याची भिती आहे. त्यामुळे या दोन्ही नद्या काठचे शेतकरी नदीकाठी वस्ती करून राहिलेल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –