कारले लागवड; वाण व पूर्व मशागत

कारले हे सर्वांचे नावडते असले तरी आरोग्याच्या व उत्पादनाच्या  दृष्टीने फायदेशीर आहे. स्थानिक बाजारपेठेत पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाची कारलेला भरपूर मागणी असते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात खपतात.
_*हवामान*_ : कारले हे वेलवर्गीय पीक असून हे साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारले हे उष्ण हवामानातील पीक आहे. महाराष्ट्रामध्ये कडक थंडीचा काळ वगळता वर्षातून दोनदा कारल्याची लागवड करता येते. खरीप हंगामकरिता लागवड जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी ते मार्च पर्यंत लागवड करता येते.
_*बियाणे*_ : कारल्याच्या लागवडीसाठी 4 ते 5 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागतात.
_*जमीन, पूर्वमशागत आणि लागवड*_
कारल्याच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी व सुपीक जमीन आवश्यक असते. जमिनीची चांगली नांगरट करून 2-3 कुळवाच्या उभ्या आडव्या पाळ्या घालून घ्याव्यात. शेवटच्या पाळीच्या वेळी 10-12 टन शेणखत प्रति एकर टाकून घ्यावे. लागवडीसाठी दोन ओळींमधले अंतर मंडप पद्धतीने 2.5 मीटर तर ताटी पद्धतीने 1.5 मीटर ठेवावे.
? _*वाण*_ :
_*हिरकणी*_ : फळे गडद हिरव्या रंगाची, 15 ते 20 सेंमी. लांब व काटेरी असतात. सरासरी उत्पादन 130 क्विंटल प्रति हेक्टर एवढे मिळते.
_*फुले ग्रीन गोल्ड*_ : फळे गडद हिरव्या रंगाची, 25 ते 30 सेंमी. लांब व काटेरी असतात. हेक्टरी 230 क्विंटल उत्पादन मिळते.
_*फुले प्रियांका*_ : या संकरित जातींची फळे गर्द हिरवी, 20 सेमी. लांब व भरपूर काटेरी असतात. ही जात खरीप व उन्हाळी लागवडीस योग्य आहे. ही जात केवडा या रोगास बळी पडत नाही. सरासरी उत्पादन 200 क्विंटल प्रति हेक्टरी आहे.
_*कोकण तारा*_ : फळे हिरवी, काटेरी व 15 सेमी. लांबीची असतात. फळे दोन्ही टोकाला निमुळती व मध्यभागी फुगीर असतात. निर्यातीसाठी अशी फळे योग्य असतात. सरासरी उत्पादन 15 ते 20 टन प्रति हेक्टर आहे. कोकण विभागात या जातीच्या लागवडीची शिफारस आहे.