शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

बुलडाणा,(जिमाका)दि. 19 : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये  नुकत्याच झालेल्या पावसाने तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेडनेटचे नुकसान झाले आहे. तसेच शेडनेटमधील पिकांप्रमाणे इतर पिकांचे तालुक्यात 11.85 हेक्टरवर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी  तालुका कृषी अधिकारी व महसूल प्रशासनाला दिल्या.

पालकमंत्री श्री. शिंगणे यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील शेलगांव राऊत, विझोरा, उगला पिंपळगांव लेंडी यासह अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष जावुन नुकसानीची पाहणी केली आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रशासनास सहकार्य करून आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास मदत करावी आणि प्रशासनाने कुणीही नुकसानग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. नुकसानीचे पंचनामे करून शासनास पाठविल्या जाणार आहे.  शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

सिंदखेड राजा तालुक्यामध्ये पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेडनेट मध्ये असलेला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते आहे. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना आधार देणे व त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणं हे शासनाचे व प्रशासनाचे काम आहे, अशी प्रतिक्रियाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.  यावेळी उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर , कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्यासह मंडळ अधिकारी , तलाठी कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.