राजू शेट्टींच्या मदतीला हार्दिक पटेल ; मुंबईचा दुध पुरवठा रोखणार

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईकरांचा दूधपुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीला गुजरातच्या पटेल आंदोलनातील नेते हार्दिक पटेल मैदानात उतरणार आहेत. १६ जुलैला आंदोलनादरम्यान राज्यातील दुधाची रसद स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी तोडल्यानंतरही मुंबईला सूरतहून दूधपुरवठा होण्याची शक्यता आहे. मात्र, सूरतहून कोणत्याही परिस्थितीत दुधाचा पुरवठा होणार नाही, याची खबरदारी नाशिकमधील स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने हार्दिक पटेल घेणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना दूधपुरवठा रोखण्याच्या आंदोलनावर ठाम आहे. संघटनेने आखलेल्या रणनीतीनुसार सूरतमार्गे होणारा दूधपुरवठा रोखण्यासाठी हार्दिक पटेल यांची मदत घेतली जाईल. तिथे नाशिकचे कार्यकर्तेही मदतीसाठी असतील. औरंगाबाद-सोलापूरमार्गे येणाऱ्या दुधाचा पुरवठा रोखण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर यांचे दौरे त्या ठिकाणी सुरू आहेत. बारामती आणि पुणे या भागात खासदार राजू शेट्टी स्वत: दौरे करत आहेत.