राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार पाऊस सुरुच; तर ‘या’ भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पाऊस

पुणे –  राज्यात पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. गेले दोन ते तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात, पुढचे 2 ते 3 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे.

नागपुरात जोरदार पाऊस कालपासून सुरुच आहे. आज देखील पावसाचा जोर वाढला आहे. तर इकडे रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याचे चित्र आहे. काल दुपारनंतर सुरु झालेला पाऊस जोरदार बॅटिंग करताना दिसतोय. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे.

कोकणातील  चिपळूण शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे सावट आहे. चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी दापोलीलाही पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.सध्या पाणी ओसरलं असलं तरी पावसाची संततधार सुरूच आहे. दुपारी पुन्हा भरती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तिकडे यवतमाळ सह नेर तालुक्यातील गावांत गारपीट झाली. वाई हातोला, आनंद नगर, टाकळी सलामी, पिंपरी कलगा, माणिकवाडा गावांना गारांचा तडाखा बसला. यासोबत आर्णी, पुसद, उमरखेडमध्येही जोरदार पाऊस बरसला. दरम्यान,काल परभणी जिल्ह्यासह शहरात जोरदार पाऊस बरसला. तर सेलू तालुक्यातील कूपटा भागालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे सेलू कूपटा रोडवरील काही गावांचा संपर्क तुटला. तर पालम शहरालगत असलेल्या लेंढी नदीला पूर आला. त्यामुळे जांभूळ बेटाकडे जाणा-या 5 गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

गोंदिया जिल्ह्यात देखील पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. शहरासह ग्रामीण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार एक दोन तास बॅटिंग सुरु असून काही तालुक्यात संततधार पाऊस येत आहे. संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. शहर परिसरातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील जायकवाडी, मांजरा, निम्न तेरणाचा अपवाद वगळता निम्न दुधना, विष्णुपुरी, माजलगाव, बिंदुसरा, सिंदफणासह जवळपास सर्वच लहान-मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. सर्वात मोठे धरण असलेले जायकवाडी धरण सध्या 45%, मांजरा नदीवरील धरण 51% तर निम्म तेरणा धरण 61% भरली आहेत. ही धरणे पूर्ण भरण्यासाठी पाणलोट क्षेत्रात आणखी पावसाची आवश्यकता आहे.

महत्वाच्या बातम्या –