पुढील ४८ तासात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता

अवकाळी

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या होत्या. जून महिन्याच्या प्रारंभी दाखल झालेल्या मान्सूनने बराच काळ विश्रांती घेतली. त्यानंतर 8 जुलै पासून मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे आजपासून पुढील 4 दिवस मुंबई , ठाणे , पालघर भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान आता 12 ते 14 जुलै दरम्यान मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असून अंतर्गत भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासात रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच कोकणातील सर्व जिल्हे तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकणातील गुहागर १००, काणकोण, हर्णे, श्रीवर्धन ७०, पेडणे, रत्नागिरी ६०, देवगड, म्हापसा, मार्मगोवा, वाल्पोई ५०, दोडामार्ग, पणजी, केपे, राजापूर, सांगे, वैभववाडी, वसई ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचबरोबर कोकणातील बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला.

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापुरातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याती शक्यता आहे. हे अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –