राज्यातील ‘या’ भागात ऐन दिवाळीत जोरदार पाऊस; ; मका, कापूस, तूरीचे मोठे नुकसान

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील गंगाथडी परिसरात शुक्रवारी जोरदार पाऊसाने हजेरी लावली. गतवर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने, ढगफुटीच्या पावसाने हाहाकार उडाला होता. त्यावेळी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मका, कापूस, तूर, मुग, भुईमूग, सोयाबीन, बाजरी, ऊस तसेच कडधान्ये, कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

याआधी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोरसर येथे शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन देखील केले होते. ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. परंतु अजून पर्यंत ह्या मागण्या मान्य झालेल्या नाही. वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे १ लाख ४ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानीच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून मागणीच्या ७५ टक्के म्हणजे ८० कोटी ४ लाख ८६ हजार २५० रुपये प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्याच्या सूचना प्रशासन स्तरावरून देण्यात आल्या आहेत.

मात्र तलाठ्यांकडून शेतकऱ्यांच्या सुधारित याद्या तयार करण्यास विलंब होत असल्याने दिवाळीच्या दिवसांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी पूर्वी मदतीची रक्कम जमा करण्यात येईल असे शासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र, शासनाकडून मदतीची रक्कम प्राप्त होऊनही वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप ही रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही. महसूल विभागाकडून याद्यांचा खेळ सुरू असून, बँकानाही सुटी असल्यामुळे शेतकऱ्यांना आणखी काही दिवस मदतीची वाट पहावी लागणार आहे.