कर्जमाफी योजनेचा लाभ किती शेतक-यांना मिळाला?- डॉ. पतंगराव कदम

सांगली : राज्य शासनाने मोठी भीमगर्जना करून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात आजअखेर किती शेतक-यांना कर्जमाफी मिळाली? कडेगाव तालुक्यातील किती शेतक-यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला व सांगली जिल्ह्यातील किती शेतकरी कर्जमुक्त झाले? याचा खुलासा राज्य शासनाने करावा, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी केले.

केवळ शेतक-यांची दिशाभूल करण्यासाठीच राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. परंतु प्रत्यक्षात किती शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ झाला, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. त्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन किती शेतकर्‍यांना लाभ मिळाला, याची माहिती घेतली पाहिजे. कडेगाव तालुक्यातील किती शेतक-यांना त्याचा फायदा झाला, हे तपासले पाहिजे.

सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा शेतक-यांना आर्थिक संकटातून सोडविले गेले पाहिजे. कडेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत प्रांताधिकारी यांना सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी प्रश्‍नांबाबत वारंवार चर्चा व बैठका झाल्या आहेत. ताकारी व टेंभू या दोन उपसा जलसिंचन योजनांचे आवर्तन सुरू झाले आहे. कडेगाव शहरात दारूबंदी झालीच पाहिजे, यासाठी आपला बिनशर्त पाठिंबा आहे. दारूबंदी होण्याकरिता सर्वतोपरी मदत केली जाईल. मात्र उत्पादन शुल्क विभागाकडून सध्या महिलांच्या स्वाक्षरींची फेरपडताळणी करण्याच्या निर्णयाबाबत डॉ. पतंगराव कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.




Loading…