तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान – उदय सामंत

उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी – तोक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा  सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचे या वादळात फार मोठे नुकसान झाले आहे  अशी माहिती  पालकमंत्री  उदय सामंत यांनी दिली.  तसेच जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची मदत तातडीने मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहितीही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

या वादळात जिल्ह्यातील मच्छीमार, आंबा व काजू बागायतदार  तसेच अन्य फळ पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, कृषि, महसूल या विभागाने तात्काळ पंचनामे करावेत असे आदेश आपण दिले आहेत. जिल्ह्यातील शाळा, कॉलेजच्या इमारतीचे नुकसान झाले असेल तर त्यांचेही पंचनामे करावेत अशा आपण सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही आपण चर्चा केली असून  कोकणासाठी विशेष मदत देण्यासाठी पत्रही लिहले आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील बहुतांश  विद्युत पोल पडल्यामुळे  विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. पिण्याच्या पाण्यासह  दूरध्वनी आणि मोबाइल सेवा ठप्प झाल्या आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे  अनेक वसाहती तसेच खाजगी गृहनिर्माण  संस्थांमधील तसेच वैयक्तिक स्वरुपाच्या   विद्युत पंपाचा पुरवठा खंडित असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्यभरातून 130 जणांची एकूण 13 पथके जिल्ह्यासाठी पाठविण्यात येत आहेत. त्यामध्ये बारामती, सातारा, कोल्हापूर सह रत्नागिरी येथील पथकांचाही समावेश आहे. त्याशिवाय तज्ज्ञ अभियंत्यांचे एक पथकही जिल्ह्यात लवकरच दाखल होणार असल्याची माहितीही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –