पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

रत्नागिरी – तोक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. आज मुख्यमंत्री नुकसानीचा आढावा घेणार आहेत. रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत.

अशातच रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.सोबतच या दौऱ्यावर मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी नाही, तर कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

“मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असंही ते म्हणाले.

रत्नागिरीमधील प्राथमिक आढावा घेतला आहे. नुकसानग्रस्तांना कोणत्या निकषानुसार मदत जाहीर करायची याचा निर्णय पूर्ण आढावा झाल्यानंतर घेण्यात येईल. तसेच, पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी रत्नागिरीमध्ये दिली. या दौऱ्यादरम्यान आपण जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींना वेळ देणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान,मागील वर्षी सुद्धा निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर ठीक वर्षभरानंतरच पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर आहेत.

महत्वाच्या बातम्या –