ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही – नितीन गडकरी

नितीन गडकरी

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आजचा २० वा दिवस आहे.आंदोलनावर तोडगा कधी निघणार याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या आंदोलनावर भाष्य केलंय.

शेतकऱ्यांसोबत जर संवादच झाला नाही, तर चुकीचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. त्यामुळे, संवाद झाल्यास चर्चेतून मार्ग निघेल, शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि सर्व प्रश्न संपतील. आमचं सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधेल, त्यांना पटवून देईल आणि चर्चेतून नक्कीच मार्ग काढेल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

दरम्यान,महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार,’ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही’, असं नितीन गडकरींनी यावेळी म्हटलंय. जिथे संवादच नसेल तिथे विसंवादासाठी भरपूर जागा उरते. त्यामुळे समस्यांत आणखीन भरच पडते. संवाद झाला तर अनेक प्रश्न सुटू शकतात. शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, दिलासा मिळू शकतो असं त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना लिहिलेल्या पत्रात हजारे म्हणाले की, सरकारने किमान आधारभूत किंमती (MSP) बाबत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू न केल्यास ते उपोषण सुरू करतील.

अण्णांनी माजी कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन दिली आहे. गेल्या आठवड्यात एका व्हिडिओ संदेशात हजारे यांनी शेतकरी नेत्यांना सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका असा इशारा दिला कारण पीएमओ, कृषिमंत्री आणि इतर मंत्र्यांनी त्यांना लेखी आश्वासन दिलेले होते परंतु त्यावर कार्य झालेले नाही.

महत्वाच्या बातम्या –