जर दानवेंना शेतकऱ्यांचा कळवळा आहे तर त्यांनी कृषी कायदा समजावून देण्यासाठी दिल्लीला मैदानात जावे

रावसाहेब दानवे

पुणे – एकीकडे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत.

दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच टीकेचे धनी बनले आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत रावसाहेब दानवेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्यांच्याकडे याबाबबतचे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांना द्यावेत आणि आपल्या वक्तव्यावर ठाम राहावे, असा खोचक सल्ला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्षाने देखील दानवे यांच्यावर टीका केली आहे.

‘आप’चे नेते मुकुंद किर्दत म्हणाले, आज जालना येथे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरु शेतकरी आंदोलनाबाबत बेताल वक्तव्य केलं आहे, अश्या बातम्या येत आहेत. शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याची अजब माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. जो शेतकरी आम्हा कोट्यवधी जनतेला अन्न पुरवतो, त्याच्या मागे उभे राहणारा देशप्रेमी आणि त्याला विरोध करणारा देशद्रोही हे साधे समीकरण दानवेनी लक्षात घ्यावे!

किर्दत म्हणाले, खरेतर भारतीय शेतकरी हा आत्महत्या च्या टोकापर्यंत गेलेला ,पिचलेला वर्ग आहे. त्याला स्वामिनाथन आयोग लागू करून शेतीमालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन भाजप ने दिले. हमीभावाची कायदेशीर तरतूद नसल्याने तर शेतकरी असाच लहरी हवामान आणि दलालांच्या खेळाचे बळी ठरतात. आता त्यालाच देशद्रोही ठरवण्याचे कारस्थान दानवे रचत असावेत. जर दानवे यांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे तर मग त्यांनी कृषी कायदा समजावून देण्यासाठी दिल्लीला मैदानात जावे ,इथे बसून बेताल वक्तव्य करू नये असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –