नवी दिल्ली – २६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली. या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले.
२६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चावेळी आंदोलकांनी घातलेल्या हैदोसाला दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. आंदोलकांना भडकावल्या प्रकरणी राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर, योगेंद्र यादव यांच्यासह ३७ शेतकरी नेत्यांवर देखील विविध प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना नोटीस बजावली असून कारवाई का करू नये यासाठी तीन दिवसात उत्तर देण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आपली बाजू मांडली आहे. ‘प्रशासनाने शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात फसवलं आहे. मोदी सरकारला आमचं आंदोलन चालू द्यायचं नसेल तर त्यांनी आम्हाला अटक करावी, पण अशा चक्रव्यूहमध्ये अडकवू नये. ज्यांनी पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला, मार्ग बदलला, त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही,’ असा खुलासा देखील टिकैत यांनी केला आहे. ‘जो आंदोलकांचा जत्था लाल किल्ल्यावर पोहोचला त्यांना पोलिसांनी अडवलं नाही,’ असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 जाहीर
- राज्यात ७३ टक्के कोरोना लसीकरण
- मोठी बातमी – शेतकरी संघटनांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
- मोठी बातमी – ट्रॅक्टर रॅलीमुळे वाद सुरु असताना आता भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा
- शेतकऱ्यांवर मोठं संकट – राज्यातील ‘या’ भागांमध्ये उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता