शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्यांसोबत राज्यातील मंत्र्यांच्या घरी दसरा दिवाळी साजरी करू

शेतकरी

सध्या परतीच्या पावसाने राज्याच्या विविध भागाध्ये धुमाकूळ घातला आहे.अनेक जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तशीचं काहीशी बिकट अवस्था वाशीम जिल्ह्यात देखील आहे. शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. त्याला एकरी पंचवीस हजाराची मदत करा. जर शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळाली नाही तर विदर्भात आंदोलन तीव्र करून शेतकऱ्यांसोबत राज्यातील मंत्र्यांच्या घरी दसरा दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्यसरकारला दिला.

एकीकडे, पावसामुळे ही स्थिती असतानाच दुसरीकडे रिसोड तालुक्यातील कुऱ्हा, मांडवा, गणेशपूर, जवळा, मोरगव्हाणसह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे सोयाबीन काढणीचा खर्चही वसूल होत नाही. तर जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी ६६ पैसे जाहीर केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात वाशीम जिल्ह्यातील रिसोडच्या तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला.शेतकऱ्यांच्या एल्गार मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर सामील झाले होते. त्यांनी प्रशासनाकडे त्वरित वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासह एकरी २५ हजार मदत देण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघटनेच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी शेतकऱ्यांना प्रशासनाकडून योग्य मदत दिली जाते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या –