मजूर, शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय, छोटे व्यवसायी यांना मदत करण्यासाठी पॅकेजची घोषणा तत्काळ करा – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्य सरकार हाती घेणार असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करण्याची भूमिका आमची पूर्वीही होती आणि पुढेही राहील. जनता सुद्धा सहकार्य करेल. पण राज्य सरकारने सुद्धा जनतेचा विचार करून त्यांना तत्काळ आर्थिक मदत केली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे सांगितले.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही मंत्र्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयावह होते आहे. आज सुमारे ५७ हजार रुग्ण आढळल्याची माहिती आहे. फेरपडताळणीमध्ये सुमारे ४०० मृत्यूंची एकूण संख्येत वाढ होणार असल्याची सुद्धा माहिती आहे. अशात राज्य सरकार हाती घेणार असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करण्याचीच आमची भूमिका आहे. कार्यकर्त्यांना सुद्धा तशा सूचना देण्यात आल्या असून लसीकरण मोहिमेत नागरिकांना अधिक संख्येने सहभागी करून घेण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.

सध्याच्या स्थितीत केवळ लॉकडाऊन की अंशतः लॉकडाऊन यावर नाही तर हा नवीन विषाणू कसा आहे, त्याचा महाराष्ट्रातच इतक्या वेगाने प्रसार का, तो नेमका काय परिणाम करतो आणि त्यापासून बचावासाठी काय केले पाहिजे, मृत्यू कमी होतील म्हणून वेळीच कोणती खबरदारी घेतली पाहिजे, यावर सुद्धा सरकारच्या वतीने प्रबोधन झाले पाहिजे. नागरिकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. दरम्यानच्या काळात आपण संवाद साधला तेव्हा हा विषाणू फुफ्फुसांवर अधिक परिणाम करतो, असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे.

राज्यात मुंबई आणि पुणे ही महत्वाची शहरे आहेतच. तेथे काळजी घेतलीच गेली पाहिजे. पण या दोन शहरांसोबत इतर शहरे सुद्धा महाराष्ट्रात आहेत. या शहरांमध्ये आरोग्य व्यवस्था ही राज्य सरकारच्या अखत्यारीत असते. आज रुग्णांना भरती करण्यासाठी या शहरांमध्ये रुग्णालयात जागा नाही, ही स्थिती अतिशय गंभीर आहे आणि त्याकडे तातडीने लक्ष द्यावे लागेल. या मधल्या काळात राज्य सरकारने सक्ती करून सुमारे ५००० कोटींची वीजबिलांची वसुली केली. आता तरी वीजजोडणी तोडणे बंद करून ही वसुली थांबविली पाहिजे.

सोबतच मजूर, शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय, छोटे व्यवसायी यांना मदत करण्यासाठी पॅकेजची घोषणा तत्काळ केली पाहिजे. कोरोनाच्या विषयावर आम्ही कधी राजकारण केले नाही. पण आपली अकर्मण्यता लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर टीका करणे महविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा बंद केले पाहिजे. राजकारण करू नका, अशी एकतर्फी अपेक्षा करून चालणार नाही. आम्ही आधीही सहकार्य केले आणि पुढेही करू, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –