गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करा- धनंजय मुंडे

औरंगाबाद : अचानक आलेल्या गारपीटीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांना अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. यात सर्वाधिक नुकसान जालना जिल्ह्यात झाले आहे. या जिल्ह्यात  झालेल्या गारपिटीत शेतात काम करण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. जालना पाठोपाठ बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील काही गावे गारांच्या तडाख्यात सापडली. गारपिटीने रब्बी ज्वारी, हरभरा, गहू आदी रब्बी पिकांसह द्राक्ष, संत्रा आणि मोसंबीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पीक कोलमडून पडली, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या घराचे नुकसान झाले.  या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी. असे धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे यांनी ट्वीट करताच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत ‘गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची तातडीने दखल घेत मी जिल्हाधिका-यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.