मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – उदयनराजे भोसले

सातारा – बंगालच्या उपसागरावरून आलेला कमी दाबाचा पट्टा काल आंध्रप्रदेश ओलांडून कर्नाटक सीमेलगतच्या भागातून महाराष्ट्रात आला, परिणामी काल पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं. सोलापूर, सातारा, कोल्हापूर सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, अनेक भाग जलमय झाले, नद्यांना पूर आले. आधीच भरलेल्या धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करावा लागला.

दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेला एक आवाहन केले आहे. भोसले यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली असून या पोस्ट मध्ये ते म्हणतात,सातारा जिल्ह्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रात कालपासून सुरू झालेली अतिवृष्टी पुढील तीन – चार दिवस विजेच्या गडगडाटासह अतिमुसळधार पाऊस राहणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की, आपण पावसाच्या वातावरणात घराबाहेर जाणे टाळावे. वीजा चमकत असल्यावर योग्य ती खबरदारी घ्यावी. लहान – मोठे जलाशय – तलाव आदींच्या परिसरात जाणे टाळावे. वाहत्या पाण्यात पोहायला जाण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस पडत असताना झाडाचा आसरा घेऊ नये. विद्युत उपकरणांचा वापर जपून करावा.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या व सुरू असलेल्या पावसाने शेतीला मोठा फटका बसतो आहे याची पूर्ण जाणीव आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करावा व विमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई बाबत कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सांगली परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यात काल रात्री पर्यंत 2643.5 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे..पुण्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल . सिंहगड् रस्ता वाहतूक साठी बंद करण्यात आला होता. पुणे सोलापुर महामार्ग जड वाहनांना रात्रीनंतर सुरू करण्यात आला आहे. उजनि धरणातून सोडेलेल पाणी इंदापुर शहरात शिरल. निमगांव केतकी गावात पुरात अडकलेल्या 55 नागरिकांना वाचवण्यात यश आलं आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रातून नदी पत्रात ३४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सात वाजता सोडण्यात आला आहे. तसेच परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग सोडला जाणार असल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान,हा कमी दाबाचा पट्टा अजूनही पश्चिम महाराष्ट्रातच असून तो उद्या कोकण ओलांडून अरबी समुद्रावर पोहोचेल. त्यानंतर त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या किनाऱ्या लगतच्या समुद्रावरून तो उत्तरेकडे कूच करण्याची शक्यता आहे . त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात येत्या दोन दिवस अनेक ठिकाणी मेघगर्जनेसहीत, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकणात काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्याजसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील घराबाहेर शक्यतो पडू नये. अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातही आज आणि उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र आता पावसाचा जोर ओसरू लागेल. उर्वरित राज्यात17 ऑक्टोबरनंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल.

महत्वाच्या बातम्या –