शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करणार- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येईल आणि सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. येत्या 31 डिसेंबरपर्यंत हा निर्णय लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांसमवेत मंत्रालयात महासंघाच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. केंद्राप्रमाणे राज्यातही पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, वेतन त्रुटींबाबत बक्षी समितीचा दुसरा अहवाल तत्काळ सादर करणे, केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील वाहतूक भत्त्यासह इतर भत्ते मिळणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, महिला कर्मचार्‍यांसाठी दोन वर्षांची बालसंगोपन रजा देणे, प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देणे, अधिकार्‍यांच्या पाल्यांनाही अनुकंपा भरती सुविधा लागू करणे अशा विविध 18 मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. महासंघाच्या या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, त्याबाबत निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाच्या 7 लाख 17 हजार मंजूर पदांपैकी 1 लाख 91 हजार रिक्त पदे कंत्राटीऐवजी योग्य मार्गाने भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिला कर्मचार्‍यांना दोन वर्षे बालसंगोपन रजा मंजूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. शासकीय अधिकार्‍यांच्या पाल्यांना काही अटींच्या अधीन राहून अनुकंपा तत्त्वावर भरतीचा निर्णय घेण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या – अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागासाठी काय आहेत महत्त्वपूर्ण घोषणा

झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटपाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री