कडाक्याची थंडी असताना पाण्याचे फवारे मारण्याचे आदेश देऊन एक प्रकारे हुकूमशाहीला जन्म दिलाय

मिटकरी

नवी दिल्ली – केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 7 दिवस पूर्ण झाले आहेत. बुधवारी दिवसाच्या सुरुवातीलाच आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. त्यामुळे बॉर्डर बंद करण्यात आली. त्यानंतर दुपारी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये सहमती झाली आणि शेतकरी दिल्लीहून नोयडाला येणाऱ्या रस्त्यावरुन बाजूला हटले. मात्र, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं. संध्याकाळी सर्व शेतकरी संघटनांची एक बैठक पार पडली. त्यावेळी सरकार संघटनांमध्ये फुट पाडत असल्याचा आरोप या शेतकरी संघटनांनी केलाय. आज सरकार आणि शेतकरी संघटनांच्या होणाऱ्या बैठकीत सरकारला 7 ते 10 पानी निवेदन दिलं जाणार आहे.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

या आंदोलनाला आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील पाठींबा दिला आहे. ‘केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशस्तरावर शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनांला पाठिंबा देण्यासाठी ३ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना व कामगार संघटना राज्यभर आंदोलन करत आहेत. दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात होत असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्रिय पाठिंबा देत आहे’. अस ट्विट करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हाताळण्यात अपयशी ठरत असलेल्या आणि आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर करणाऱ्या केंद्र सरकारवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केली आहे. ‘पंजाब, हरियाणा, मधील शेतकरी लोकशाही मार्गाने दिल्लीला यायला निघाले असताना प्रत्येक जिल्ह्यात मोदी सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी अश्रुधुरा चे गोळे आणि कडाक्याची थंडी असताना पाण्याचे फवारे मारण्याचे आदेश देऊन एक प्रकारे हुकूमशाहीला जन्म दिला आहे’. अस ट्विट करत मिटकरी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या बातम्या –