बीड: उसाला 3 हजार रुपये भाव देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना येथे जागरण-गोंधळ घालून तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती. कारखानदारांनी अद्यापही उसाचा भाव घोषित केलेला नाही. माजलगाव सहकारी साखर कारखान्याने उसाला तीन हजार रुपये हमीभाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज शिवसेनेने कारखान्यासमोर जागरण-गोंधळ करून तीव्र निदर्शने केली.
या आंदोलनात, वडवणी तालुका प्रमुख विनायक मुळे, धारुर तालुका सरचिटणीस मधुकर तिडके शेकडो शिवसैनिक यांचेसह शेतकरी सहभागी झाले होते. सोळंके कारखाण्याचे कार्यकारी संचालक एम. डी. घोरपडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिंद्रुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद यांचेसह आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.