शेतकऱ्यांना आपला पाठिंबा देत केरळच्या शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलकांसाठी पाठवला अननसांचा ट्र्क

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

शेतकरी आंदोलन थांबणार किंवा नाही, हे उद्या (30 डिसेंबर) दुपारी 2 वाजता शेतकरी नेते आणि सरकारमध्ये होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत म्हणाले की, उद्या होणाऱ्या बैठकीत मागण्या मान्य झाल्या तर ठिक अन्यथा 26 जानेवारीपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत.

दरम्यान, या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवणारा थेट दक्षिणेमधील केरळ राज्यातून चक्क एक ट्रकभर अननस केरळमधील शेतकऱ्यांनी पाठवले आहेत. केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील अननस उत्पादक शेतकऱ्यांनी आपण या संघर्षात आंदोलक शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे दाखवण्यासाठी हा ट्रक पाठवल्याचे समजते. सध्या या केरळमधील शेतकऱ्यांवर त्यांनी केलेल्या या कामासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नाताळाच्या दिवशीच संध्याकाळी एर्नाकुलम जिल्ह्यातील वाझाकुल्लम येथील केरळ पायनॅपल असोसिएशनमधील शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी उत्तरेकडील राज्यांमधील आंदोलक शेतकऱ्यांसाठी एक ट्रकभर अननस पाठवले. वाझाकुल्लमला केरळमध्ये पॅनॅपल सिटी म्हणून ओळखलं जातं. येथील अननस हे भारतभरात पाठवले जातात. यासंदर्भात द न्यूज मिनिटशी बोलताना अननस उत्पादक शेतकऱ्यांनी आम्ही हा ट्रक आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पाठवला आहे. दिल्लीच्या सीमांजवळ हे शेतकरी दिवस-रात्र आणि थंड वातावरणामध्ये आंदोलन करत असल्याने आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही हा ट्रक पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे हे शेतकरी सांगतात.

महत्वाच्या बातम्या –