अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. संगमनेर शहर व तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे. मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. सध्याच्या कोरोना काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्व देत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर मात करण्यासाठीचे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान संगमनेर तालुक्यात प्रभावीपणे राबवा, अशी सूचना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल मार्गदर्शन करताना थोरात बोलत होते. ते म्हणाले, गाव निहाय स्थापन केलेल्या आरोग्य समितीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करावी. ग्रामीण भागामध्ये होणारे घरगुती समारंभ नागरिकांनी जाणीवपूर्वक टाळण्यासाठी पदाधिकार्यांनी मार्गदर्शन करावे. या संकटाच्या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्व द्यावे.
याबाबत सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अधिक जागरूक होऊन आपल्या परिसरातील नागरिकांना सद्यस्थितीची माहिती देणे, कोरोनाची साखळी तोडणे हे आपले सर्वांचे अंतिम उद्दिष्ट आहे, असे थोरात म्हणाले.यावेळी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मिरा शेटे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या –
- लिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार
- आंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- राज्यात पुढील आठ दिवस मुसळधार पावसाची शक्यता