IND vs WI : ‘तू तर पावशेर पण नाहीस’; नेटकऱ्यांनी उडवली चहलची खिल्ली

IND vs WI : विंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी विशाखापट्टणम् येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ प्रवास करून तिथे दाखल झाला. गुवाहाटी येथून विशाखापट्टणमला जाण्यासाठी विमानातून प्रवास करताना भारताचा फिरकीपटू युझवेन्द्र चहल याने एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. हा फोटो असाच शेअर केला असला तरी या फोटोवरून तो चांगलाच ट्रोल झाला.

चहलने सलामीवीर शिखर धवन याच्या सोबतचा फोटो पोस्ट केला. हा फोटो अगदी साधा (रँडम) होता. पण त्यावर टाकलेल्या कॅप्शनमुळे हा फोटो चर्चेत आला आणि या कॅप्शनवर चाहत्यांनी त्याची खिल्ली उडवली. त्याने हा फोटोला ‘शेर आणि बब्बर शेरचा दोघे एकत्र प्रवास करत आहेत’, अशी कॅप्शन दिली. पण ते चाहत्यांना अजिबात रुचले नाही. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली.

काहींनी या दोघांना इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीची आठवण करून दिली. काहींनी त्यांना ‘पावशेर’ म्हणत खिल्ली उडवली. काहींनी तर शिव्यांची लाखोलीही वाहिली.

दरम्यान, गुवाहाटी वन डेत विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात चहलने तीन बळी टिपले. पहिल्याच सामन्यात भारताने ८ विकेट राखून विजय मिळवला. त्यानंतर विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रवाना झाला.