जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हर, सात-बारा अपडेटला येईल वेग

सोलापूर : जिल्ह्यातील सात-बारा खातेदारांची संख्या विचारात घेऊन जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हर द्यावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला होता, हा प्रस्ताव मान्य करून सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हर देण्यात आला आहे. यामुळे यापुढील काळात सात-बारा अपडेट, दुरुस्ती नोंदी घेणे ही कामे अधिक वेगाने होणार आहेत.

सात-बारा पुनर्दुरुस्ती करण्यासाठी १५ सप्टेंबरची अंतिम मुदत दिली आहे. मोठ्या लोकसंख्येच्या गावातील उतारे दुरुस्ती ३० सप्टेंबरपर्यंत करावी, असे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील उतारे दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.

प्रशासनाने यापूर्वी जुलै महिन्यात सर्व गावांमध्ये उतारे दुरुस्त करून त्याचे चावडी वाचन केले. त्यावर सूचना, हरकती घेऊन उतारे दुरुस्तीची मोहीम राबवली. मात्र नेटवर्कच मिळत नसल्याने कामे होण्यात अडचणी येत होत्या. पोलिस पाटील कोतवालाची रिक्त पदे भरण्याचे आदेश आहेत. त्यानुसार आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

२००९ मध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट बार्शी या चार तालुक्यांतील ३१७ पोलिस पाटील पदासाठी मुलाखतीही घेण्यात आल्या. काही पोलिस पाटील न्यायालयात गेल्याने ही भरती प्रक्रिया रखडली. त्यात आरक्षणपद्धती चुकीच्या पद्धतीने राबवली गेली. यामुळे ही भरती प्रक्रिया कायम करायची की पुन्हा नव्याने घ्यायची याबाबत विधी खात्याचा अभिप्राय घेणार असल्याचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.